Ad will apear here
Next
नाट्यसंजीवनी : भाग सातवा (ऑडिओसह)
संगीत शांतिब्रह्म नाटकातील एक दृश्य

रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा सातवा भाग...
.......
‘कामाची सुरुवात करणे, हीच मुळी यशाची पहिली पायरी असते, त्यातून मिळणारे अनुभव लाखमोलाचे! अपयश म्हणजे किंचित यश,’ असं विधान, कळवा येथील सुनील आंबर्डेकर यांनी अभिप्राय देताना केलं आहे. ही धारणा विधायक स्वरूपाची आहे. कोणत्याही कामाची सुरुवात अशा विधायक दृष्टीनं केली, की कार्य करण्यासाठी स्वतःलाच स्वतःची प्रेरणा मिळते. आणि असे अभिप्राय प्रेरणादायक असतात, असे मला मनापासून वाटते.

याचा प्रत्यय रोज येतो आहे आणि रसिकांची वैयक्तिक यादी व्हॉट्सअॅपवर वाढत आहे. 

अर्थात नाट्यसंगीतात माझे कर्तृत्व काही नाही. कारण पूर्वसुरींनी परंपराच अशा निर्माण केल्या आहेत, की नाट्यसंगीताच्या प्रवाहात गायक, वादक, लेखक आणि रसिक अशा भूमिका घेऊन जे कोणी प्रवाहात येतात त्यांना परंपरा आपलं मानते. फक्त सूर देण्याची प्रक्रिया कुणी तरी करावी लागते.

आज एक गमतीशीर अनुभव. पाठी वळून बघताना त्यात गंमत वाटते आहे; पण प्रत्यक्षात जेव्हा हे घडले होते, तेव्हा बोबडी वळणे, घसा कोरडा पडणे, अंगाचा थरकाप होणे या सगळ्या शब्दांचा अर्थ एकाच वेळी मी अनुभवला होता. 

प्रसंग ‘शांतिब्रह्म’च्या सुरुवातीच्या एका प्रयोगात घडलेला. त्या वेळी मी श्रीपतीशास्त्री ही भूमिका साकारत होतो. एकनाथांचे जिवलग असणारे श्रीपतीशास्त्री त्यांना भेटायला त्यांच्या वाड्यात येतात. नमस्कार, स्वागत वगैरे होतं. आणि नाथमहाराज शास्त्रीबुवांना बैठकीवर बसण्याची विनंती करतात.

प्रयोगात दादा लोगडे यांनी एकावर एक लेव्हल्स ठेवून बैठक निर्माण केली होती. आणि ती अशी ठेवली होती, की ‘ब्लॅक आउट’मध्ये ती चटकन हलवून पडदा टाकला की गोदावरी नदीचा सीन तयार होत असे.

नाथमहाराजांनी विनंती केली, की मी तिथे बसायचे आणि पाठी ठेवलेल्या लोडाला टेकून संवाद सुरू करायचे, असं दिग्दर्शकांनी सांगितलेलं होतं. विनंतीपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू झालं होतं.

इतक्यात अचानक एकनाथ महाराजांची सून विंगेतून येते आणि हातातला लोड दाखवत म्हणते, ‘शास्त्रीबुवांनी आम्हाला माफ करावं. कारण कामाच्या गडबडीत बैठकीवरचा लोड मी ठेवायला विसरले.’

ती लोड ठेवते, खाली वाकून नमस्कार करते आणि परत जाते. आणि काही झालंच नाही अशा थाटात एकनाथ महाराजांचं काम करणारे श्रीनिवास जोशी यांनी ‘श्रीहरी श्रीहरी, सूनबाईंना काम अंमळ जास्तच करावे लागते. त्यामुळे होतात चुका हातून, शास्त्रीबुवांनी मोठ्या मनानं माफ करावं,’ असं सांगून टाकलं.

दरम्यान मी चक्रावून गेलो होतो. या प्रसंगात सुनेची एन्ट्री नव्हती किंवा तिला आणि एकनाथांना, त्यांनी म्हटलेली वाक्यं नव्हती; पण एकूण घोळ चटकन लक्षात आला आणि क्षणभर श्वासच अडकला.

विंगेत उभं राहून प्रसंग पाहणाऱ्या आणि सुनेची भूमिका करणाऱ्या दीप्तीच्या लक्षात आलं, की नेहमीचा लोड ठेवायला कुणी तरी विसरलं होतं. मी सवयीनं लोड आहे म्हणून टेकलो असतो, तर उलटा खाली पडलो असतो आणि सगळ्या गंभीर प्रसंगाचा विचका झाला असता; पण प्रसंगावधान राखून स्वतःची वाक्यं घुसडत तिनं वेळ आणि अब्रू निभावून नेली होती.

पडदा पडल्यावर सगळ्यांनी तो प्रसंग एन्जॉय केला; पण मी मात्र मनातून पार घाबरून गेलो होतो. असे प्रसंग घडतात; पण रंगमंचावर प्रत्येकानं किती सावध, तत्पर असायला हवं ते शिकवून जातात.

श्रीपतीशास्त्री एकनाथांच्या बाजूने नेहमी उभे राहतात, त्यांचे समर्थन करतात; पण अनेकदा त्यांनासुद्धा प्रश्न पडतो, एकनाथ शांत कसे राहू शकतात. समाजाच्या विरोधाला शब्दातून विरोध का करीत नाहीत. त्या वेळी एकनाथ महाराज त्यांना उत्तर देतात,

‘सांगे आन, करी आन, तेथ कैचें ब्रह्मज्ञान।’

हेच पद आपण आज ऐकणार आहोत. गायलं आहे निषाद बाक्रे यांनी आणि संगीत आणि संवादिनीसाथ दिली आहे अनंत जोशी यांनी.

- डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.

संपर्क : ९४२३८ ७५८०६

(नाट्यसंजीवनी या मालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://bit.ly/2XwoQN6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZBQCN
Similar Posts
नाट्यसंजीवनी : भाग आठवा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा आठवा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग दहावा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दहावा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग नववा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा नववा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग पाचवा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा पाचवा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language